ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथेनमामि चंद्रभागा अभियानाची बैठक संपन्न

चंद्रभागा,इंद्रायणी आणि उपनद्यांचे शुद्धीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश

चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियानासंदर्भात साखर संकुल, पुणे येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नद्या प्रदूषित होण्याची कारणमीमांसा सांगून त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचे  सादरीकरण प्रस्तुत केले.
    इंद्रायणी व इतर नद्यांच्या काठांवर असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधून नद्यांमध्ये येणारे प्रदुषित पाणी व कचरा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे जल प्रदूषणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचे या सादरीकरणाच्या माध्यमातून सांगण्यात आले.  नुकतेच आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना इंद्रायणी नदीसह वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी उपाययोजना केली जाईल व आठ दिवसात याबाबत बैठक घेतली जाईल अशी ग्वाही दिली होती. आज साखर संकुल पुणे येथे नमामि चंद्रभागा अभियानाची माहिती अधिकाऱ्याकडून शरद पवार व ना. जयंत पाटील,ना. दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आली.या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव यासंदर्भात मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार असून नदी शुद्धीकरणासाठी करावयाची उपाययोजना व निधीची उपलब्धता याबाबत विचार विनिमय केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *