ताज्याघडामोडी

चेहऱ्यावर गरम पाणी ओतले; नंतर कपडे जाळले, पतीला कंटाळून पत्नीने घर सोडलं, नंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का

सध्या नवरात्रमुळे सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना अमरावती जिल्ह्यात एका संशयी वृत्तीच्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतले. त्यांचे कपडेसुद्धा जाळले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केली. या अतोनात छळाला कंटाळून पत्नी भावाकडे गेल्यावर पतीनेच ती घरातून पळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यामुळे पत्नीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल करून संपूर्ण आपबिती पोलिसांसमोर कथन केली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन अपत्येदेखील आहेत. परंतु पती हा संशयी वृत्तीचा असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. पतीचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी २०१७ मध्ये पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती. त्यांचा अर्ज समुपदेश केंद्रात आल्यावर यानंतर त्रास देणार नाही, असे पतीने त्यांना लिहून दिले होते. त्यामुळे त्या मागील दोन महिन्यांपासून पुन्हा पतीकडे राहायला गेल्या. त्यानंतरही तो त्यांना मद्य प्राशन करून त्रास देऊ लागला. त्यांच्यावर संशयसुद्धा घेऊ लागला. दोन महिन्यांपूर्वी त्या मेसचे काम संपवून घरी गेल्यावर पती हा मद्य प्राशन करून आला. त्यावेळी त्याने माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून त्यांच्याशी वाद घातला. पैसे आणण्यास नकार दिल्यावर पतीने त्यांच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतले. त्यात त्या ८ टक्के जळाल्या. मात्र, मुलांकडे बघून त्यांनी त्यावेळी पतीच्या प्रतापावर पडदा टाकला.

स्वयंपाक करताना गरम पाणी अंगावर उडाले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतरही पतीच्या वर्तवणुकीत कुठलाही बदल झाला नाही. पतीने पुन्हा तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यांनी नकार दिल्यावर पतीने घराचे दार बंद करून त्यांना मारहाण केली. त्यांचे कपडे जाळून कुठे जाते तर जा, असा दम त्याने भरला. त्यामुळे त्या जीव वाचविण्यासाठी भावाकडे निघून गेल्या. त्यानंतर पतीनेच पत्नी पळून गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. याबाबत पोलिसांनी त्यांच्या भावाला मोबाइलवर कॉल करून कळविल्यावर त्यांना धक्का बसला. त्यामुळे पीडित महिलेने गाडगेनगर ठाणे गाठून संपूर्ण आपबिती पोलिसांसमोर कथन केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *