ताज्याघडामोडी

शरद पवार साहेबांसाठी तीन दिवस ठाण मांडून बसला, संयम संपला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी घेतलेल्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, असा एकच धोशा या कार्यकर्त्यांनी लावला आहे.

शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक सेनेचे कार्यकर्ते बाहेर ठाण मांडून बसले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांचा जमाव घोषणबाजी करत होता. यावेळी जमावातील एका कार्यकर्त्याने रॉकेलची बाटली बाहेर काढून त्यामधील रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता स्वत:ला पेटवून घेणार होता. परंतु, आजुबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून बाजूला नेले. यावेळी मोठी झटापट पाहायला मिळाली. हा कार्यकर्ता कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला आवरण्यासाठी इतरांना बरेच प्रयत्न करावे लागले.

यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आत्महदनाचा प्रयत्न करणारा या कार्यकर्ता भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस युवक सेनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते. रॉकेल ओतून घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने एका खोलीत नेले. त्याच्या अंगावरील रॉकेलने भिजलेला शर्ट काढून घेण्यात आला. बाहेर झालेल्या झटापटीमुळे या कार्यकर्त्याची शुद्ध काहीशी हरपली होती. मात्र, त्या अवस्थेतही तो घोषणा देत होता. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आमच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.

आम्ही गेलव्या तीन दिवसांपासून शरद पवार यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आहोत. आता तुम्ही मला पकडलं असलं तरी शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास मी कधी ना कधी तर जीव देणारच. आमच्यासाठी शरद पवार हेच सर्वकाही आहेत. आम्हाला निवड समितीच्या बैठकीशी काहीही देणेघेणे नाही, अशी प्रतिक्रिया आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *