बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव आहे.
बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील २६ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मावशी मीना रामकृष्ण जाधव यांनी ३० मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता तरुणी पूर्णिमा दिनकर इंगळे बुलढाणा येथील सखी वन स्टॉप या कार्यालयात पॅरामेडिकल विभागात कार्यरत होती.
ड्युटीवर जात आहे असे सांगून गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली, मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही. ती मिळून न आल्याने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.