ताज्याघडामोडी

देवीची क्षमा मागून चोरट्याने लंपास केले मंदिरातील साहित्य

ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडवर कचोरे गावातील ग्रामस्थांचे गावदेवी मंदिर आहे. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चोरटयाने हातात पिशवी घेऊन गावदेवी मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी मंदिरात कोणी नव्हते. हीच संधी साधून त्याने मंदिराच्या खिडकी बाहेर रस्त्यावर नजर टाकली. त्यानंतर देवीच्या मंदिरात चोरी करण्याआधी तो चोरटा चक्क देवीला आपण करीत असलेल्या कृत्याची हात जोडत क्षमा मागत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे सर्वांत आधी मंदिरातील एका कोपऱ्यात पितळेची दोन ते अडीच फुटाची मोठी समई चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती त्याला चोरता आली नाही. अर्धा मिनिट पुन्हा देवी समोर उभा राहून हात जोडत क्षमा मागितली. त्यानंतर दानपेटी शोधत होता. मात्र दानपेटी मंदिरात नसल्याने अखेर त्याने देवीच्या समोरील छोटे दिवे आणि पितळेचे दोन फुटाचे त्रिशूळसह तांब्याचा लोट्यामधील पाणी देवी समोरच पूजेच्या ठिकाणी ओतले. यानंतर रिकामा तांब्याचा लोटा पिशवीत टाकून मंदिरातून पळ काढला.

चोरट्याने केवळ दोन मिनिटाच्या आताच मंदिरात डल्ला मारून छोटे दिवे आणि पितळेचे दोन फुटाचे त्रिशुळसह तांब्याचा लोटा असा दोन हजाराचा मुद्देमाल चोरला. यानंतर देवीला हात जोडून नमस्कार करत निघून गेला. मात्र चोरीचा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. गेल्या वर्षीही या मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या चोरीप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात संतोष बाळाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंडे करीत आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे लवकरच त्या चोरट्याला अटक येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पूर्वेडील टिळकनगर पोलीस ठाण्यात त्या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *