ताज्याघडामोडी

‘ज्या तांबेंनी मोदींच्या पोस्टरला काळं फासलं, त्यांचा प्रचार करणार?’ काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना डिवचलं

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अखेरच्या टप्प्यात भाजपने पाठिंबा दिला आहे. यावरून काँग्रेसने मात्र आगपाखड सुरू केली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावरून टीका केली आहे. ‘ज्या सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं त्याच तांबेंचा प्रचार करण्याची वेळ आज भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मात्र पदवीधर अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवतील’, असेही काळे यांनी म्हटले आहे.

जिल्ह्याची काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे नगर शहर आणि जिल्ह्याचीही सूत्रे काळे यांच्याकडेच आहेत. त्यांनी आज कार्यकर्त्यांची ऑनलाइन बैठक घेऊन उद्याच्या मतदानाचे नियोजन केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपने तांबे यांना पाठिंबा दिल्याचे आज सकाळीच उघड झाले. त्यावर काळे बोलले. ‘पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तांबेचे काम करा, असा आदेश दिल्याचे भाजपचेच कार्यकर्ते आता जाहीररित्या सांगायला लागले आहेत. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ऑनलाइन बैठकीत तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही कधी काँग्रेसची नव्हतीच.

त्यांनी गद्दारी केली आहे. ते भाजपचेच आहेत. पदवीधर अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवतील. तांबे किती खोटे बोलतात हे आता पदवीधरांना समजले आहे. अगदी कालपर्यंत सुद्धा ते मी काँग्रेसचाच आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला आहे, अशा वल्गना करत होते. मात्र आता तांबे यांचे पितळ उघडे पडले आहे. जर ते काँग्रेसचे आहेत तर त्यांना भाजपचा पाठिंबा चालतो कसा? ते भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष यांना काल भेटायला गेले कशाला?’ असा सवालही काळे यांनी यावेळी केला आहे.

पदवीधर मतदार हा सुशिक्षित मतदार आहे. त्याला हे समजत आहेत. योग्य निर्णय घेण्याची कुवत असणाऱ्या मतदारांना वेड्यात काढण्याचा त्यांचा प्रयत्न पदवीधर स्वतःच निवडणूक हातात घेऊन असफल करत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तांबे यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या मोदींना काळं फासलं आहे, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?,’ असा सवाल यावेळी किरण काळे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *