ताज्याघडामोडी

निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि….

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत होती. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याची गडबड सुरु असतानाच सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बेणापूर-विठ्ठलनगर इथल्या उदय आनंदराव भोसले या तरूणाचं अपहरण करण्यात आलं. बेणापूर ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. विटा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत.

उदय भोसले या तरूणाचे 1 डिसेंबर रोजी खानापूर इथल्या यश कॉम्प्युटर सेंटर इथून भरदिवसा अपहरण झालं होतं. याप्रकरणी पत्नी छाया भोसले यांनी गब्बर उर्फ प्रताप करचे याच्यासह अनोळखी तरूणांविरूध्द विटा पोलीसांत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अपहरणाच्या तिसऱ्या दिवशी तरूण उदय भोसले हे खानापूर पोलीस क्षेत्रात आले. त्यावेळी त्यांचा पोलीसांनी जबाब घेतला. 

उदय भोसले बेणापूर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी खानापूर इथल्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेले होते. यावेळी गब्बर उर्फ प्रताप करचे आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून अपहरण केलं. त्यानंतर अपहरकर्त्यांनी उदय भोसले यांना ओमनी कारमधून टेंभूर्णी, मोडनिंब परिसरात नेलं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी उदय भोसले यांना सोडून दिलं.

बेणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी अर्ज भरू नये, यासाठी वरील चौघांनी माझे अपहरण केल्याचे उदय भोसले यांनी पोलीसांना सांगितले.

याप्रकरणी पोलीसांनी गोरख माने आणि गोविंद महानवर या दोघांना अटक केली असून मुख्य संशयित गब्बर करचे तसंच मिथून घाडगे हे दोघेजण फरार आहेत. या घटनेत वापरलेली ओमनी कार पोलीसांनी जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *