गेल्या कित्येक वर्षांपासून भुवैकुंठ पंढरी नगरीतील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले आणि गेले परंतु अद्यापही पांडुरंगाच्या नगरीत वास्तव्य करणारे नागरिक विविध सोयी-सुविधांपासुन वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी या आषाढी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची महापुजा करण्यासाठी पंढरपूरला येण्यापूर्वी येथील एमआयडीसी, महाद्वार वेसची पुनर्बांधणी, चंद्रभागेची प्रदुषणमुक्ती, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारक, नगरपालिका करमुक्ती, रस्ते दुरुस्ती व आमचे आदिवासी महादेव कोळी जामातीच्या मागण्या तसेच उजनी धरणाचे पाणी पावसाळ्यात सोडण्याचं योग्य नियोजन आदी मुलभूत आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा अजेंडा घेवूनच पंढरीत यावे. अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने गनिमी काव्याने तीव्र आंदोलन करु! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री साहेब आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न आणि आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारक उभारणीचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेला आहे. चंद्रभागेच्या तीरावरच भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं आपण हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं; परंतु अद्यापही याची वचनपुर्ती केली नाहीत. गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात उजनी धरणावरील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अविचाराने धरणातुन सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेच्या काठावरील अनेक गावांना आणि पंढरपूर शहरालाही महापुराचा तीव्र तडाखा बसला होता. त्यामुळे यंदा व यापुढे तशी परिस्थिती पुन्हा उद्भवु नये यासाठी उजनी धरणावरील पाणी सोडणेबाबत योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
पंढरपूर शहरातील उच्चशिक्षीत गुणवंत तरुणाई इथे हाताला रोजगार नसल्याने बाहेरगावाला जात आहे. इथल्या गुणवत्तेचा वापर येथील विकासासाठी होत नसून इतर शहरांच्या विकासासाठी होतोय. त्यामुळे इथं एमआयडीसी ची उभारणी होणं आवश्यक आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देणारी पुरातन महाद्वार वेस पाडली गेल्याने भुवैकुंठ पंढरी नगरीचं ऐतिहासिक सौंदर्य लोप पावलेलं आहे. पाडल्या गेलेल्या याच वेशीच्या छायाचित्रावरुन प्रतिरुप ठरेल अशी महाद्वार वेस पुन्हा बांधावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. याचबरोबर पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पुर्ण होणे आवश्यक आहे. कोरोना काळात कामधंदे बंद असल्याने स्थानिक नागरिकांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्यानेे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांना करमुक्ती जाहीर करावी. कोरोनामुळे पंढरीच्या विविध यात्रा शासनाने रद्द केल्याने स्थानिक नागरिकांची आर्थिक उलाढाल ठप्प झालेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील वारीवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत घोषीत करावी.
वरील सर्व मागण्यांची पुर्तता करण्याचे योग्य नियोजन करुनच मुख्यमंत्री साहेबांनी भुवैकुंठ पंढरी नगरीत श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या महापुजेस यावं अन्यथा सर्व प्रशासकीय यंत्रणेला गुंगारा देवून आम्ही आमच्या स्टाईलने गनिमी काव्याचा अवलंब करत आंदोलन करु. असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे