गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक

सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील भोंदू मांत्रिकाच्या घरात घडली आहे.

याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ उच्चाटन, अधिनियम 2013 चे कलम 3(2), 3 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी दोन भोंदू मांत्रिकासह त्याचे पाच साथीदार आणि दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. काजी दाउद शेख आणि बंधू तुकाराम वाघ असे अटक भोंदू मांत्रिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील सोनगावातील रशीद फकीर शेख यांच्या बंद घरात सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजल्याच्या सुमारास भूत आणि करणीची बाधा झालेल्यावर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती शेजाऱ्याने गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडताच घरामधील अघोरी दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला होता.

घरातील एका खोली दोन तरुणी व भोंदू मांत्रिक आणि त्याचे साथीदार अघोरी पूजेचे साहित्य लिंबू , मिरची, गुलाल, अभीर अगरबत्ती, नारळ इत्यादी असे साहित्य ठेवून त्या तरुणीवर अघोरी कृत्य करताना घरात दिसून आले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने भोंदू मांत्रिक, त्याचे साथीदार आणि तरुणींना पंचनामा करून घरातील अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले.

तर संजय लक्ष्मण भोईर, (वय 40 ) यांच्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाण्यात भोंदू मांत्रिकासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काजी दाउद शेख, बंधू तुकाराम वाघ, विजय बंधू वाघ भोंदू मांत्रिकासह साईनाथ गोपाळ कदम (वय 36 ), गणेश पोपटराव देशमुख (वय 36 ), दत्तात्रेय बाळकृष्ण चौधरी (वय 36), गणेश रामचंद्र शेलार (वय 32 ) यांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे.

विशेष म्हणजे, नाशिकवरून आणखी एक मांत्रिक अघोरी पूजेसाठी येणार असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. आता पोलीस त्याही भोंदू मांत्रिकाच्या शोधात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *