एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन बोलतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात येवून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, किरणकुमार बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येवून त्यांचे निलंबन करण्यात यावे, यावरुन मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे. या गंभीर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर बोलतांनाची संभाषणाची ऑडीया क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडीयो क्लिपमध्ये किरणकुमार बकाले यांनी बोलतांना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या ऑडीयो क्लिपबाबत तसेच प्रकाराची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. डॉ प्रवीण मुंढे यांनी किरणकुमार बकाले यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. योग्य ती चौकशी करण्यात येवून असून किरणकुमार बकाले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी बोलतांना दिली आहे.
कर्तव्यदक्ष अधीकाऱ्याने अशा प्रकाराचे वक्तव्य करणं ही शरमेची बाब आहे. समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच काम पोलीस अधीकार करत असतील, अशा प्रवत्तींना जागीच ठेचलं पाहिजे, अशी कडक शब्दात प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण दिलींय. कुठल्याही अधिकाऱ्याची असली मगरुरी खपवून घेतली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं. तक्रारीनंतर किरणकुमार बकाले यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी थातूर मातूर कारवाई केली असा आरोप करत, तीन दिवसात किरणकुमार बकाले यांच निलंबन झालं नाही, तर दहा हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर घेवून जाणार असल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
मराठा समासाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची पोलीस सेवेतून बडतर्फ करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक एखादा समाजाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनात जर समाजाबद्दल इतका द्वेष व राग राहत असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून सामाजिक न्यायाची व सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल.
आपल्या पदाचा दुरुपयोग करून आक्षेपार्ह बोलल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने तातडीने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्याला समर्थन देणारे पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांना त्वरीत कायमस्वरूपी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने केली आहे.