गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस उपनिरीक्षकाने PM मोदींबद्दल लिहला आक्षेपार्ह मजकूर; अनेक राजकीय नेत्यांवर पोस्ट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबना सोबतच सूर्यवंशी विरुद्ध प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सूर्यवंशी गंभीर पोस्ट करीत तो नेता, त्यांचे कुटुंबीय सोबतच धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकत होता. शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपुर जिल्ह्याच्या कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध २९४, २९५ (अ), ५००, ५०४, आयटी एक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल झाला ही बाब लक्षात घेता भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे. बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते.

फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली आहे. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता, परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते मात्र आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधिक्षकांनी त्याला निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *