हवामान विभागाचा माहिती
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतात. तर मागच्या दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे पुढे सरकले आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा आस पुढील आठवड्याच्या शेवटी मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होणार आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
राज्याती पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी, घोटी, इगतपुरी या परिसरात जोरदार पाऊस कायम राहणार आहे. साधारणपणे तीन दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारनंतर ता. 23 पावसाचे प्रमाण कमी होईल. काही ठिकाणी तुरळक आणि हलका पाऊस बरसत राहणार आहे.