गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सासूचा केला खून, सुनेला अटक

सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सूनेने चक्क सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण येथे घडली आहे.

सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला. याच वादातून सुनेने सासूचा खून केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सुनेला अटक केली आहे.

सुषमा अशोक मुळे (वय-71 रा. पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे Suvarna Sagar Mule (वय-32) हिला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद सुभाष शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार वाद होत होते. गुरुवारी दुपारी सून सुवर्णा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेजारी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचे सांगितले. यावरून दोघींमध्ये वाद झाला.

दरम्यान, सासू सुषमा भाकरी करत असताना सुनेने तिला बाजूला सारले. यामध्ये दोघींमध्ये झटापट झाली. एकमेकींना खाली पाडले. राग अनावर झाल्याने सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीने सासूचा मागून गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर तिने पतीला सासू चक्कर येऊन पडल्याची माहिती दिली.

मुलगा सागर कामावरुन घरी आल्यावर त्याने आईल उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता. चाकण पोलिसांना माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक शेंडकर व इतरांनी रुग्णालयात धाव घेतली.

त्यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी याबाबत मयत महिलेचा मुलगा सागर याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर सून सुवर्णाकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *