मुलगा आणि मुलीचे बँक खात्याचे चेक चोरुन त्यावर बनावट सह्या करुन आईनेच बँक मॅनेजरशी संगनमत करुन १४ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी लोकमान्यनगर येथे राहणार्या एका २१ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२२) दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची आई व बँक मॅनेजर गौरव गिरीश लोणकर (वय ३१, रा. नर्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बँक ऑफ बडोदाच्या सदाशिव पेठ शाखेत १८ मे २०२१ रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या आई व बहिणीसह लोकमान्यनगर येथे राहतात. फिर्यादी व त्यांच्या बहिणीचे बँक ऑफ बडोदाच्या सदाशिव पेठ शाखेत खाते आहे. त्यांच्या आईने फिर्यादी यांचे दोन चेकवर प्रत्येकी ५ लाख रुपये व बहिणीच्या चेकवर ४ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम टाकून त्यावर बनावट सह्या केल्या.
त्या खर्या आहेत, असे भासवून परस्पर बँकेतून ही रक्कम काढून त्याचा अपहार केला. फिर्यादीची आई व बँक मॅनेजर यांनी दोघांची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.