स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावाताली आहुजानगर येथे घडली आहे. महेंद्र देवीदस पाटील (वय 22, रा.आनोरे, तालुका अमळनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र हा त्याच्या बहिणीकडे आहुजानगर येथे राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी ग्रुप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती.
यामध्ये त्याला कमी गुण मिळाले होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने नोट मध्ये आई-वडिलांचे आभार मानल्याचेही समोर आले आहे.
महेंद्र याची बहिण व मेव्हणे 22 मे रोजी आनोरे गावात लग्नाला गेले होते. यावेळी महेंद्र हा एकटाच घरी होता. महेंद्र यास त्याची बहिण भारती यांनी मंगळवारी फोन केला मात्र फोन व्यस्त असल्याने संपर्क होवू शकला नाही. नंतर भारती यांनी बुधवारी फोन केला तेंव्हा महेंद्र ने फोन घेतला नाही. अऩेक वेळा काॅल करूनही काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने भारती यांनी शेजाऱ्यांना सांगून महेंद्र याची विचारपूस केली.
शेजाऱ्यांनी भारती यांच्या घराचा दरवाजा वाजवला मात्र आतून लाॅक करण्यात आले होते. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता घरात महेंद्रने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
महेंद्रने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. यात आई- वडील देवासारखे आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. जीवन अनमोल आहे, माझा गोल वेगळा आहे, पण माझ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले.
त्यामूळे मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचा मजकूर चिठ्ठीत लिहून शेवटी महेंद्रने आई वडिलांचे आभार मानत आत्महत्या केली. दरम्यान, महेंद्र हा अभ्यासू आणि हसतमुख होता. त्याला पीएसआय बनायचे होते. मात्र मध्येच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.