तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर संभाजीराजेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून सुनावलं होतं. या घटनेमुळे संभाजीराजे यांचा अपमान झाल्याचं म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चानं संताप व्यक्त केला. मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी आता तुळजापूरमध्ये १०० टक्के बंद पाळण्यात आला आहे.
तुळजापूर बंदला पुजारी व्यापारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हा बंद मंदीर तहसीलदार व व्यवस्थापक यांच्या कारवाईच्या मागणीसाठी करण्यात आला आहे. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे, त्यामुळे महाराज संभाजीराजे यांना अडविले होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्धा गाभाऱ्यात सोडले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजीराजे छत्रपती नाराज व संतप्त झाले होते.
या प्रकरणी तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत. यासाठी आज तुळजापूर १०० टक्के बंद ठेवण्यात आले आहे. व्यापारी संघाने या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.