राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या पदाचा दुरूपयोग करून त्या राजकीय लढाई करीत असल्याचा आरोप असून ही याचिका इंडियन बार असोसिएशनने दाखल केली आहे.
या याचिकेत भाजपा नेते नारायण राणे आणि गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे चाकणकर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
काय आहे गणेश नाईक प्रकरण
ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दीपा चौहान या महिलेनं गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य महिला आयोगाकडेही संबंधित महिलेनं तक्रार केली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाईकांच्या अटकेचे आदेश दिले होते.