उष्णतेचा पारा चढला असताना गेल्या आठवड्यात पावसाने अनेक भागात हजेरी लावली. येत्या 48 तासांत राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीय वाऱ्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात देखील वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात 19 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत वाऱ्याच्या बदललेल्या स्थितीमुळे तापमानात बदल झाला आहे.
राज्यात विदर्भ वगळता बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, एकिकडे विदर्भात तापमानाचा पारा अद्यापही चढलेलाच आहे. विदर्भातील तापमान वाढत असल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने आंबा व द्राक्षाच्या बागांना याचा फटका बसणार आहे.