गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पैशांसाठी खासगी सावकाराने दिड महिन्याच्या बाळालाच पळवले

कोरोनामुळे कितीतरी सामाजिक स्थित्यंतरे घडत असताना सातार्‍यात देखील धक्कादायक प्रकार कधी कधी समोर येत आहेत. असाच धक्कादायक व वेदनादायी प्रकार एका कुटुंबाबाबत घडला असून खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे.

मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी राहणार्‍या कुचेकर कुटुंबियासमवेत हा प्रकार घडलेला आहे. अभिषेक कुचेकर या युवकाने काही आर्थिक अडचणीमुळे सदरबझार येथील संजय बाबर व अश्‍विनी पवार-बाबर या खासगी सावकारी करणार्‍या दांम्पत्याकडून गतवर्षी 30 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर एक वर्षभरात अभिषेक कुचेकर याने बाबर दांम्पत्याला 60 हजार रुपये परत केलेले आहेत. एका वर्षात दुपटी, चौपटीने व्याज वसूल करुन देखील बाबर दांम्पत्याची भूक थांबली नाही.

बाबर दांम्पत्य सातत्याने 30 हजारांपोटी आणखीन पैशांची मागणी कुचेकर यांच्याकडे करतच होते. शेवटी शेवटी तर गत चार ते पाच महिन्यापूर्वी अभिषेक कुचेकर यांची दीड महिन्याची मुलगीच या बाबर दांम्पत्याने घरात येवून उचलून नेली आहे. अभिषेक याची पत्नी नुकतेच जन्मलेल्या तिच्या दीड महिन्याच्या मुलीला असे कोणीतरी उचलून नेल्याने मुलीसाठी तिचे आईचे काळीज तडफडत आहे.

त्यामुळे कुचेकर कुटुंबियांनी गत चार ते पाच महिन्यात बाबर दांम्पत्याकडे जावून मुलीला परत करण्याची मागणी केली तरी दगडाचे काळीज असलेल्या बाबर दांम्पत्याने छोट्या मुलीला त्यांच्याच ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवले आहे.

अभिषेक त्याच्या मुलीला परत आणण्यासाठी संजय बाबर यांच्याकडे गेल्यावर त्याला व त्याची पत्नी पायलसह कुचेकर कुटुंबियांना बाबर दांम्पत्याकडून थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच ही मुलगी त्यांना विकली असल्याचे सांगून अजून चार ते पाच लाख रुपये द्या व मुलगी घेवून जावा, अशी दमदाटीही बाबर दांम्पत्याकडून कुचेकर कुटुंबियांना केली जात आहे.

चार ते पाच महिन्यापासून एक माता तिची नुकतीच जन्म झालेल्या दीड महिन्याच्या मुलीपासून वेगळी करुन माणुसकी किती खालच्या स्तराला गेलेली याचे धक्कादायक उदाहरण सातार्‍यातील बाबर दांम्पत्याने जगासमोर आणले आहे.

कर्जाची मूळ घेतलेली रक्कम भागवून आणखी त्यावर दुप्पट रक्कम एका वर्षात देवून छोट्या मुलीला आणखी पैशांची मागणी करत गहाण ठेवून घेणार्‍या या कलियुगातील प्रकाराला आता नेमके काय म्हणायचे असा प्रश्‍न सातारकरांना ही घटना वाचून निश्‍चितपणे पडल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *