पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई,गुन्हा दाखल
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत बोकाळलेल्या अवैध धंद्याबाबत आवाज उठवला खरा पण तो केवळ मंगळवेढा शहर तालुक्यापुरताच असल्याचे लक्षात आल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात मटका,अवैध वाळू उपसा,अवैध दारू विक्री असले कुठलेही प्रकार सुरु नसावेत अशी आमदार आवताडे यांची पटली असावी अशीही खुमासदार चर्चा पंढरपूर शहर तालुक्यात होताना दिसून आली.पुढील दोन दिवसात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी अवैध वाळू उपशावर कारवाईही केली.या कारवाईमुळे केसेस झाल्या.पण हे सारे घडत असताना शहरातील अनेक ठिकाणी कोपऱ्यावर थांबलेले मटका एजन्ट हे दृश्य काही बदलले नाही अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य नागिरक व्यक्त करताना दिसून आले.गेल्या काही दिवसात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ मटका एजन्टावर गुन्हा दाखल केला तर तालुका पोलिसांनीही कारवाई करत एका मटका एजन्टावर कारवाई केली.या कारवाईत हे एजन्ट कुठल्या बुकी चालकाच्या शोधात होते हे मात्र अजून समजू शकले नाही तर पूर्वीप्रमाणे आता चिट्ठ्या गोळा न करता थेट मोबाईलवर चिट्ठीचा फोटो पाठवला जात असल्याने बुकी मालक शोधणे कठीण नाही अशीही चर्चा यातील जाणकार करू लागले.३१ डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत आणखी एका एजन्टावर गुन्हा दाखल केला,सव्वाआठशे रुपये त्याच्याकडे आढळले आणि त्याने स्वतःच बुकी मालक असल्याचे तपासात सांगितले.
मागील काही महिन्यापूर्वी शहरातील बुकी मालकांमध्ये एजन्टाचे कमिशन आणि फिगर बसल्यानंतर देण्यात येणारी रक्कम या बाबत सोशल मीडिया वॉर झाल्याची चर्चा होताना दीसून आली.थेट व्हाटस अप स्टेट्सवर रुपयाच्या फिगरला आपणच कसे जास्तीत जास्त रक्कम देतो यांचे स्टेट्स ठेवले गेल्याचीही चर्चा झाली.शहरातील एका राजकीय नेत्याने तर या दराबाबत ओपन चॅलेंज चे स्टेट्सही ठेवल्याची चर्चा झाली.यातून काही बुकी चालकांमध्ये एजन्ट फोडाफोडी वरून मोठा वादही झाल्याचे समजते.अशातच आता जुना कराड नाका परिसरात आणखी एक बुकी चालक उदयास आल्याने हा वाद आणखी वाढला असल्याचीही चर्चा होत असतानाच पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याने या मटका एजन्टाकरवी बुकी मालकांची पाळे मुळे खणून काढावीत अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.जुलै महिन्यात अशाच काही मटका एजन्टावर गुन्हे दाखल करण्यात आले होते,ते गुन्हे दाखल करतेवेळी काही राजकीय नावेही फिर्यादीत पुढे आली होती.पण त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाली याची माहिती मिळू शकली नाही.
( क्रमश 🙂
पुढील भागात चिट्ठी चोरांशी परस्पर संधान,सारेच आलबेल