मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी कळवलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्या पक्षात नाराज होत्या. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात, अशी तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. या सगळ्या प्रकरणानंतर त्या मनसेला जय महाराष्ट्र ठोकणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.
अनेक दिवसांपासून त्या मनसेत नाराज होत्या, तेव्हापासूनच त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. अखेर तो अंदाज खरा ठरलाय. शुक्रवारी त्या आपल्या मनगटावनर घड्याळ बांधून राजकारणातली आपली नवी इनिंग सुरु करतील.