ताज्याघडामोडी

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत विवाहसोहळा

भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे  यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

निहार ठाकरेंचा वकिली व्यवसायात जम

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे.

28 डिसेंबरला मुंबईत विवाह सोहळा

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा 28 डिसेंबरला मुंबईत पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी 17 डिसेंबरला भोजन सोहळ्याचं आयोजन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *