राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोपेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं लोणीकरांना चांगलंच भोवण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी जालन्यातील पोलीस ठाण्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्याविरोधात मोटर सायकल रॅली काढत जाहीर निषेध नोंदवला होता.
काय आहे प्रकरण?
भाजपचे परतूर येथील आमदार बबनराव लोणीकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत, कोणतीही परवानगी न घेता शुक्रवारी जालन्यातील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
काय होतं वक्तव्य?
यावेळी आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राठोड यांच्यासमोर राज्याचे आरोग्यमंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून अवमानास्पद शब्द वापरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना बोलताना लोणीकर यांनी टोपे हे हरामखोर आहेत, असे वक्तव्य केले. त्यामुळे आमदार लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निकाळजे यांनी तक्रारीत दिला होता.
बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोणीकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून आला. त्यामुळे जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या फिर्यादीवरून बबनराव लोणीकर यांच्याविरोधात कलम 500 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.