एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून घेण्यासाठी एकीकडे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दिवाळीच्या दिवळी बीडमध्ये घडली आहे. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली. बाळू महादेव कदम (वय 35) असे चालकाचे नाव आहे. तो आष्टी येथील रहिवासी आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले.
चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच वाहतूक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे. बस कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी बीड आगारांमध्ये कामबंद आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या घडलेल्या प्रकारामुळे एसटी कामगारांचे प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.