ताज्याघडामोडी

पुढील काही दशके केंद्रात भाजपाची सत्ता 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा दावा केला होता. तसंच घडलं. निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. आता प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो.

भाजप पुढील अनेक दशकं हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग ४० वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची आहे. जनता नाराज आहे आणि पीएम मोदींना उलथवून टाकेल, असं काहींना वाटत असेल. तर असं अजिबात होणार नाही. जनतेने मोदींना हटवले तरी भाजप कायम राहणार आहे, असं प्रशात किशोर म्हणाले.

विरोधी पक्षांनी पीकेचा मुद्दा गांभीर्याने का घ्यावा?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयामागे प्रशांत किशोर यांची रणनीतीही महत्त्वाची मानली जात होती. कालांतराने प्रशांत किशोर यांनी भाजपची साथ सोडली. आणि ते विरोधी पक्षांना जाऊन मिळाले. २०१५ च्या बिहार विधानसभेत महाआघाडीचा (JDU+RJD+काँग्रेस) विजय मिळवून देत त्यांनी आपली रणनीती सिद्ध केली. बिहार निवडणुकीनंतर प्रशांत किशोर हे भाजपच्या लाटेला राजकीय ‘तोड’ म्हणून उदयास आले. त्यांनीही एकापाठोपाठ एक अशा विविध राज्यांमध्ये भाजपेतर पक्षांच्या विजयाची पटकथा लिहिली. पंजाबमधील काँग्रेस असो, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी असो, दिल्लीत अरविंद केजरीवाल असो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असो की तामिळनाडूत एमके स्टॅलिन असो. प्रशांत किशोर हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रशांत किशोर यांच्या म्हणण्याला किती वजन असतं, हे विरोधी पक्ष अधिक ठळकपणे सांगू शकतील.

५ राज्यांच्या निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांचं मोठं भाकीत

अंगदने पाय रोवला होता, तसाच पाय भारतीय राजकारणात भाजपने रोवला आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले. येत्या काही महिन्यांत म्हणजे पुढच्या वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचं हे वक्तव्य खूप काही सांगणारं आहे. पुढच्या वर्षी यूपी, उत्तराखंड, पंजाब, गुजरात आणि गोवा या ५ महत्त्वाच्या राज्यांमद्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

यामुळे प्रशांत किशोर यांचे हे भाकीत भाजपेतर पक्षांचं मनोधैर्य नक्कीच खचवणारं आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनतेत नाराजी आहे आणि वेळ आली तर जनता भाजपला उखडून फेकेल, असा विचार करून विरोधी पक्षांनी हातावर हात ठेवून बसून नये, असं स्पष्ट संदेश प्रशांत किशोर यांनी दिला आहे. यामुळे विरोधी पक्षांना आपल्यातील उणीवा आणि त्रुटींवर मात करून कठोर परिश्रम घ्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *