ताज्याघडामोडी

अन्यथा स्मशानभूमीतील कचरा नगरपालिकेच्या दारात टाकणार

पंढरपूर- येथील वैकुंठस्मशानभूमी समस्यांचे आगार बनले असून जागोजागी कचरा, वाळू चोरी बरोबरच आता सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे मृतासाठी ठेवलेल्या नैवेद्यावर कुत्रे व गाढवच ताव मारीत असल्याचा आरोप कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूण कोळी यांनी केला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास हा सर्व कचरा नगरपालिकेच्या दारात टाकून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अरूण कोळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपूरची हिंदू स्मशानभूमी अनेक दिवसापासून विविध समस्यांनी त्रस्त आहे. मात्र याबाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व विरोधक यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. येथील स्मशानभूमित अनेक वर्षा पासून वाळू चोरी होत आहे. परंतु याकडे पोलीस व महसूल पूर्ण दुर्लक्ष करतात. वाळू चोरीमुळे येथे रात्री व दिवसा देखील गाढवांचा सतत वावर असतो.

मयताच्या तिसर्‍याला येणारे नातेवाईक श्रध्देने दहन केलेल्या ठिकाणी नैवेद्य ठेवतात. हा नैवेद्य कावळ्याने खावा म्हणून ठेवला जातो. परंतु गाढव, कुत्रे यांची येथे ऐवढी संख्या आहे की यांना भिऊन कावळे येतच नाहीत. यामुळे आधीच शोकमग्न असलेले नातेवाईक नाराजी व्यक्त करतात. तसेच मयतासाठी वापरलेले बांबू, कपडे, दोर्‍या यांचा येथे सतत ढिग पडला असतो, परंतु याची वेळेवर स्वच्छता होत नाही. 

याबाबत मुख्याधिकारी यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली तर स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप करत आहेत. यामुळे स्मशानभूमी बाबतचे प्रश्‍न मार्गी लागले नाही तर तेथील बांबू, फुटकी मडकी आदी कचरा नगरपालिकेच्या दारात आणून आंदोलन करणार असल्याचा इशारा अरूण कोळी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *