चंदनतस्करी करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या चंदनतस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून, तो एका पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सहा किलो चंदन व दुचाकी असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.
अमर नामदेव पवार (वय 30, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38, रा. एकलव्य वसाहत, राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कात्रडचा सरपंच बाबासाहेब शिंदे व मल्हारी नावाच्या एका तरुणाचे नाव समोर आले आहे.
चंदनाची विक्री करण्यासाठी दोनजण कात्रडकडे जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना याची माहिती दिली. त्यानंतर कात्रडकडे जाणाऱया रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱया अमर पवार व विजय पवार यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सहा किलो वजनाची चंदनाची लाकडे व दुचाकी हस्तगत करण्यात आली.
पोलीस तपासादरम्यान या चंदन तस्करीमध्ये बाबासाहेब शिंदे (रा. कात्रड ता. राहुरी) तसेच राहुरी खुर्द येथील मल्हारी नामक तरुण या दोघांचा समावेश असल्याची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली. या घटनेतील बाबासाहेब शिंदे हा कात्रड ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.