फेसबुक LIVE करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाईक आहे असा दिखावा करून राज्य व देशभरातल्या लाखो शिवभक्तांची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवजन्मभूमीतल्या अक्षय बोऱ्हाडे या भामट्याचा जुन्नर पोलिसांनी खोटा बुरखा फाडला आहे.
नाव छत्रपतींचं मात्र काम तालिबानी असाच हा प्रकार यानिमित्ताने उघड झाला आहे. राज्यभरातील बेवारस दीन-दलित, बेघर, गरीब, वेडसर अशा लोकांना घरी आणून सरकारच्या मदती शिवाय सेवा करणारा व त्यांचा सांभाळ करणारा जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शिवऋण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिसांनी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला 2 दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, आता या प्रकरणात त्याची बायको रूपाली बोऱ्हाडे सुद्धा पुढे आली आहे आणि तिनेही अक्षयविरोधात तक्रार केल्याने अक्षयच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अक्षयच्या बायकोने पती अक्षय मोहन बोऱ्हाडे, सासू सविता मोहन बोराडे आणि दीर अनिकेत मोहन बोराडे या सर्वांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्रास देऊन तसेच वेळोवेळी रिव्हॉलवरची व गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे.
त्याचप्रमाणे स्वतः कोणतेही काम न करता शिवरून युवा प्रतिष्ठान या संस्थेसाठी आलेला निधी स्वतःच्या चैनीसाठी अपहार करून वेगवेगळ्या मुलींसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केला आहे, अशी तक्रार त्याच्या बायकोने दिलं आहे.
दरम्यान, अक्षय बोऱ्हाडे याने जुन्नरचे माजी नगरसेवक रुपेश शहा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात अर्ज करून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली असून अक्षयला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली होती. मात्र दरम्यान आता त्याची पत्नी सुद्धा पुढे आली असून अक्षयच्या अनेक गैरकृत्याचा तिने बुरखा टराटरा फाडला आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढली आहे.