

शेतकऱ्यांच्या,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करीत आलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची निवड करण्यात आली आहे.बळीराजा शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नितीन बागल आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री बोरा यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रामदास खराडे यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीनंतर बोलताना जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण अथक संघर्ष करणार असल्याचे सांगत कोरोना,लॉकडाऊन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची असलेली उदासीनता यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.अशातच जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले थकवली आहेत,एफआरपी पूर्ण केलेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अन्नदाता संकटात असताना बळीराजा शेतकरी संघटनेने माझ्यावर सोपविलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून मी प्रामाणिकपणे पार पाडेल अशी ग्वाही रामदास खराडे यांनी दिली.