ताज्याघडामोडी

रिलायन्स आणणार सर्वात स्वस्त जिओ 5G फोन, १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँचिंग

मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातली सर्वाधिक लक्षवेधी घोषणा 5G मोबाइल फोन ही ठरली. जिओ १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.

जे मोबाइलधारक अद्याप फिचर मोबाइल फोन वापरतात त्यांना स्मार्टफोन देण्याच्या उद्देशाने जिओ नवा मोबाइल लाँच करत आहेत.देशातील ३० कोटी मोबाइलधारक आजही फिचर मोबाइल फोन वापरतात. या ग्राहकांना डोळ्यांपुढे ठेवून जिओ सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करत आहे. जिओफोन नेक्स्ट असे या फोनचे नाव आहे. रिलायन्स आणि गूगल संयुक्तपणे हा मोबाइल लाँच करत आहेत. हा फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल. अँड्रॉइडचे आवश्यक असलेले सर्व लेटेस्ट अपडेट या फोनमध्ये मिळतील. उत्तम कॅमेरा, 5G हायस्पीड इंटरनेट ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. हा जगातील सर्वात स्वस्त फोन असेल, असे मुकेश अंबानी म्हणाले.

रिलायन्स जिओ आणि गूगल यांनी मागच्या वर्षीच एकत्र येऊन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनुसार स्मार्टफोन लाँचिंगची तयारी सुरू असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. नव्या फोनसह रिलायन्स भारतात 5G हायस्पीड इंटरनेट सेवाही लाँच करणार आहे. रिलायन्स जिओचा उद्देश भारताला 2G मुक्त आणि 5G युक्त करण्याचा आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले.

डेटाच्या वापराच्या बाबतीत रिलायन्स जिओ जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर दरमहा ६३० कोटी जीबी डेटाचा खप होतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा खप ४५ टक्क्यांनी जास्त आहे; अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. 5G स्मार्टफोन आणि 5G हायस्पीड इंटरनेट सेवा भारतात यशस्वी झाल्यानंतर परदेशात लाँच करणार असल्याचेही मुकेश अंबानी म्हणाले.

रिलायन्स जिओ आणि गूगल भारतीय ग्राहकांसाठी क्लाउड सेवेचे नवे द्वार खुले करत असल्याचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *