ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

सांगली: मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

अलमट्टीच्या पाण्यासाठी बैठक

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाबाबत एक बैठक होणार आहे. पुढच्या आठवड्यात कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

संभाजीराजेंनी काय केली होती घोषणा?

348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.

आवाज उठवत राहणार

मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *