पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर काही तासांतच पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे.शिल्पा अजय जाधव (वय 28), अजय कचरदार जाधव (वय 32) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
अजय व शिल्पा यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आज दुपारी शिल्पाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच अजयने मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या जार प्लाण्टच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येबद्दल कुणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. मात्र, दोघांनीही आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.
यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अभिषेक जाधव याने दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.