Uncategorized

”विठ्ठल” च्या अनेक हतबल भक्तांच्या मदतीला धावला पांडुरंग !

”विठ्ठल” च्या अनेक हतबल भक्तांच्या मदतीला धावला पांडुरंग !
 
राजकारण बाजूला सारत उसउत्पादकांना दिला दिलासा
 
राजकुमार शहापूरकर (पंढरी वार्ता )
 
गेल्या चार दशकांपासून उसाचे राजकारण पाहिलेल्या या तालुक्यात सध्या एक वेगळेच चित्र पाहावयास मिळत असून राजकीय गटबाजीतून अथवा राजकीय अढी मनात ठेवून आपला ऊस आपण सभासद असलेल्या कारखान्याने गळितासाठी न्यावा म्हणून हायकोर्टापर्यंत दाद मागावी लागली होती.पण या राजकीय साठमारीचा धसका घेतलेल्या सामान्य ऊसउत्पादक शेतकऱ्याना यावर्षी थोडासा उलट अनुभव येताना दिसून येत असून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात एक दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
विठ्ठल परिवारातील विठ्ठल कारखाना,सहकार शिरोमणी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखाना हे तिन्ही साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात सुरूही होऊ शकले नाहीत.मात्र या कारखान्याच्या अनेक ऊसउत्पादक सभासदांना पांडुरंग पावला असून राजकारण बाजूला सारत तालुक्यातील या तीनही राजकीय गटाचा विरोध विसरून पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युटोपियन साखर कारखाना शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेवून दिलासा देण्याचे काम करीत आहे.
पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्व.औदुंबरअण्णा पाटील जेव्हा गुरसाळेच्या माळरानावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात सोन्याचे दिवस आणायचे स्वप्न त्यांनी पहिले होते.आणि ते स्वप्न खरेही ठरले.१९८० च्या दशकात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद असणे हि गौरवाची बाब होती.या कारखान्याच्या उभारणी नंतर विठ्ठल परिवारास वैभवाचे दिवस आले. याच सुरवातीच्या दशकभराच्या काळात स्व. अण्णा गट विरोधात परिचारक गट अशी राजकीय विभागणी झाली. पंढरपूर तालुक्यात उसउत्पादकांना विठ्ठल शिवाय पर्याय नव्हता तर परिचारक समर्थकांचा ऊस हा माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रयत्नाने अजींक्यतारा सह साखर कारखाना, सहकार महर्षी कारखाना आदींसह इतर जिल्ह्यातील कारखान्यांना पाठवला जात होता. त्याकाळी राजकीय गटबाजीतून ऊस गाळपाचे निकष ठरवले जात होते. पुढे श्रीपूर येथील कारखाना सहकारी तत्वावर मा.आ. सुधाकर परिचारक यांनी विकत घेतला तर याच कालावधीत थोड्याफार फरकाने त्यांची भीमा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आणि पांडुरंग परिवारातील ऊस उत्पादकांची ससेहोलपट थांबली. भंगारात निघालेला श्रीपूर कारखाना आणि आवसानयात निघू लागेलला भीमा कारखाना त्याब्यात घेऊन त्याचे यशस्वी संचालन करण्यात परिचारक यशस्वी ठरले आणि पंढरपूर तालुक्यातील राजकारणात मोठे स्थित्यंतर आले.पण या नंतरही अनेक वर्षे शेतकऱ्याच्या उसाचे गाळप हा गावपातळीवरील राजकारणाचा कळीचा मुद्दा बनला होता.पण गेल्या काही वर्षात ज्या कारखान्याचा दर जास्त त्याच कारखान्यास ऊस हि भावना बाळगणारा ”व्यवहारी” ऊसउत्पादकांचा मोठा वर्ग उदयास आला.आणि जेवढे अधिक गाळप तेवढा कारखान्याचा फायदा जास्त हे आर्थिक गणित राजकारण बाजूला सारत कारखाने ठेवू लागले.तरीही अशा उसउत्पादकांची संख्या फार कमी होती आणि गावपातळीवरील राजकारणात जो विरोधी गटाचा त्याचा ऊस आपल्या गटाच्या अधिपत्याखालील कारखान्यास गाळपास गेला नाही पाहिजे याची गावपुढारी दक्षता घेताना दिसून येतात.मात्र राजकारण बाजूला ठेवत शेतकऱ्यांचे नुकसान टाळूयात या भावनेने या विठ्ठल,भीमा,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचा ऊस गाळपास नेवून त्यांचे नुकसान टाळा असे आदेश पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी दिल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
१९८०,९० आणि २००० च्या दशकात या तालुक्यातील उसउत्पादकांनी ऊस गाळपाबाबत अतिशय टोकाचे राजकारण अनुभवले आहे. मात्र याबाबत ब्र शब्द देखील काढण्याची हिम्मत ना या कारखान्यांच्या सभासदांमध्ये नव्हती ना सामान्य बिगर सभासद उत्पादकांमध्ये.राजकीय गटबाजीतून शेतातच उभ्या उसाला तोडीची वाट पहात जळून जाण्याचे दुर्भाग्य या तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेकवर्षे अनुभवलें आहे. आणि सूडबुद्धीने ऊस गाळपास नेला नाही यासाठी स्व. भाई मुरलीधर थोरात यांच्या सारख्या सभासदांनी अगदी हायकोर्टापर्यंत दाद मागितली आणि ऊस गाळपास नेण्यास संचालक मंडळास भाग पाडले होते तर पांडुरंग परिवारात याचीच पुनरावृत्ती याच मार्गाने करण्यास अनेक पातळीवर लढा देऊनही सी.पी. बागल हे अपयशी ठरले होते. या तीन दशकात जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला,उसाची लागण घटली तेव्हा ऊसउत्पादक शेतकरी हा साखर कारखान्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरला तर जेव्हा जेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाची आणि वरदायिनी उजनीची सलग दोन वर्षे साथ मिळाली तेव्हा गावकीच्या राजकारणात राजकीय वजन नसलेला तसेच दोन्ही राजकीय प्रवाहापैकी एकाशी बांधिलकी असलेला सभासद बळीचा बकरा बनत आला.
१९८५ साली झालेल्या निवडणुकीत स्व. औदुंबरअण्णा गटाचे विधानसभेचे उमेदवार स्व. यशवंतभाऊ पाटील हे पराभूत झाले. आ.सुधाकरपंत परिचारक हे विजयी झाले आणि इथूनच खऱ्या अर्थाने अण्णा गटाची राजकारणात ससेहोलपट सुरु झाली.पुढे कृषी उत्पन्न बाजार समिती स्व. अण्णा गटाच्या ताब्यातून गेली,पंचायत समिती,नगर पालिकाही गेली.१९९५ साली विट्ठलवर ऐतिहासिक बंड झाले.रेल्वेच्या डब्यात या बंडाचा कट शिजला अशी चर्चा पुढे झाली पण सत्य कधी समोर आले नाही समोर आले ते केवळ आणि केवळ बंड.संचालक फोडून हे बंड झाले असा आरोपही त्या काळात झाला पण पुढे स्व.अण्णांना जेव्हा या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने झालेल्या निवडणुकीत स्व. अण्णा गटाचा पराभव झाला.पण याच काळात विठ्ठल परिवाराच्या प्रत्येक समर्थकांच्या मनाने एकच जिद्द बाळगली होती. विरोधी पांडुरंग परिवारास विधानसभा निवडणुकीत अस्मान दाखविण्याची.पुढे २००९ साली विठ्ठल परिवाराने आपली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार भारत भारत भालके यांच्या रूपाने जिद्दीने हे स्वप्न पूर्णही करून दाखवले. २०१९ च्या निवडणुकीत आ. भारत भालके यांच्या हॅट्रिकचे स्वप्नही पहिले आणि पूर्ण झालेलेही पहिले पण याच दहा वर्षाच्या काळात आपण राजकारणात पुढे आणि अर्थकारणात मागे पडत आहोत याचे भान उरले नाही. २००९ साली पाहिल्यावेळी आमदार झाल्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर आ. भालके यांचा सभासद व कामगार वर्गाने जंगी सत्कार केला होता. या सत्कार समारंभात बोलताना आमदार भालके यांनी विठ्ठल सूतगिरणी सुरु करणे यास आपले प्रथम प्राधान्य राहील असे सांगितले होते.पुढें सभासदांना अर्जुन बँकेचे स्वप्नही दाखविले गेले,७ हजार टन गाळपाचे विस्तारीकरण करण्याचे महत्वही सनीतले गेले पण राजकीय श्रद्धेपोटी सामान्य समर्थकांनी कधीही यास विरोध केला नाही.तोच विठ्ठल सहकारी यंदा सुरूही होऊ शकला नाही.
याच दोन दशकाच्या काळात पूर्वाश्रमीच्या स्व. अण्णा गटातील व पुढे एकत्रित विठ्ठल परिवाराने एक सहनिर्मिती केली होती चंद्रभागा साखर कारखान्याच्या रूपाने हा साखर कारखाना सहकारी होता.गेल्या १५ वर्षात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याच्या सभादांची संख्या एकतर वाढत गेली पण हा कारखाना त्यास अपवाद ठरला. सभासद संख्या वाढली पण कासव गतीने(कमी होण्याबाबत अजून अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही). कल्याणराव काळे हे या कारखान्याचे चेअरमन,आ. भालकेंच्या सामान्य लोकांना केलेल्या मुक्तहस्त मदत कार्याने विठ्ठल सहकारी अडचणीत आला असा आरोप केला जात असतानाच कल्याण काळे यांच्या सारखा अतिशय काटकसरी ग्रामीण भाषेत चिकट स्वभावाचा चेअरमन असूनही त्यांच्या वर्चस्वाखालील सीताराम व शकारी शिरोमणी साखर कारखाना अडचणीत आला याचे मात्र तालुक्यातील जनतेतून अजूनही आशचर्य व्यक्त केले जात आहे.
पण या साऱ्या राजकीय घडामोडीत विठ्ठल परिवारातील अनेक उसउत्पादकांच्या मदतीला पांडुरंग धावला असून त्याचे समाधानही सामान्य ऊसउत्पादक व्यक्त करताना दिसून येत आहेत.तर आमदारकी बरोबरच या तालुक्यातील उसाचा लाभ पदरात पाडून निमगावच्या शिंदे परिवाराच्या अधिपत्याखालील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना मात्र याच तालुक्यात आणखी एखाद्या साखर कारखान्यासाठी जागा शोधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *