ताज्याघडामोडी

शाळेत जात नाही म्हणून आई रागावली; १३ वर्षीय मुलीने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मथुरा येथील एका १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आईसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचललं. खुशी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. ती ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

आईने कानाखाली मारल्याच्या रागातून खुशीने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनांनतर खुशीचा मृतदेह तिच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील रामवीर शर्मा रिक्षाचालक असून ते ओम नगर परिसरात राहतात. रामवीर यांना दोन मुली आणि आणि एक मुलगा आहे. त्यांचा मोठा मुलगा १२वीचा विद्यार्थी आहे. तर लहान मुलगी सहावीत शिकते. मृत खुशी नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

बुधवारी खुशी आणि तिच्या आईत काही कारणाने वाद झाला. यात रागाच्या भरात आईने खुशीच्या कानाखाली मारली. त्याच रागात खुशी न जेवता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी खुशी शाळेत जायला तयार नव्हती. त्यावेळी तिच्या आईने रागाच्या भरात पुन्हा खुशीला मारले आणि जबरदस्ती शाळेत पाठवले.

यानंतर खुशी रागाच्या भरात शाळेत न जाता मथुरा रेल्वे स्थानकावर पोहचली. रागाच्या भरात तिने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान मुलगी शाळेतून परत न आल्याने आईला चिंता वाटू लागली. आईने शोधाशोध केली असता, खुशीने आत्महत्या केल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *