कल्याण-डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या स्थानकात उभ्या आहेत तर काही गाड्या या स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन प्रवास करत आहेत. याचदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे नाल्यावरुन जात असताना चार महिन्यांचं बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते. यादरम्यान, अचानक त्या काकांच्या हातून चार महिनाचं बाळ निसटलं आणि ते नाल्याच्या पाण्यात जाऊन पडलं. नाल्याच्या तीव्र प्रवाहात ते बाळ वाहून गेलं. ही दुर्दैवी घटना २ वाजून ५५ मिनिटांनी घडली.
काही तरुणांनी नाल्याच्या दुसऱ्याबाजूने जाऊन ते बाळ कुठे सापडतं का याचा शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आलं नाही. दुसरीकडे, त्या बाळाची आई जीवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी आक्रोश करत होती. ते पाहून साऱ्यांचेच डोळे भरुन आले. सध्या रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले असून बाळाचा शोध सुरु आहे.