ताज्याघडामोडी

रुग्णाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांनी केला थेट डॉक्टरांवर आरोप

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय. यावेळी नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे. डॉक्टरांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ओतूर येथील श्री समर्थ रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता.

पोलीस डॉक्‍टरांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर येथील जमाव पांगला. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. अरविंद उल्हास गाढवे (वय ३१ रा. ओतूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मृत गाढवे यांचे काका सर्जेराव लिंबाजी गाढवे यांनी तक्रार दिली आहे. रात्री उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद उल्हास गाढवे हा (दि.१० ) रोजी जानेवारीला घराच्या बाहेर बेशुध्द अवस्थेत पडला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तात्काळ ओतूर (ता.जुन्नर) येथील श्री समर्थ हॉस्पिटल या डॉ. समीर कुटे यांच्या दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र, डॉ. कुटे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अरविंद यांनी विषारी औषध प्राशन केलेअसल्याची शक्‍यता वर्तवली. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचण्या करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरूवात केली होती.

दरम्यान, बुधवारी (दि. ११) रात्री १०.३० वाजता फोन आला की रुग्ण अरविंद यांचे हृदय बंद झाले असून त्यांना इलेक्‍ट्रीक शॉक देऊन ते पुन्हा सुरू करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी (दि.१२) सकाळी सात वाजता डॉ. समीर कुटे यांनी नातेवाइकांना पेशंटचे हृदय बंद पडत असल्याचे सांगितले. तसेच व्हेंटिलेटर असलेली रूग्णवाहिका बोलवून त्यामध्ये आपण त्याला दुसरे दवाखान्यात पाठवू असे डॉ. कुटे यांनी नातेवाइकांना सांगितले. त्यावर नातेवाईकांनी आम्ही दुसरीकडे का नेऊ असे विचारले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले, असं रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *