ताज्याघडामोडी

भाजपला धक्का देत माजी आमदाराचा मुलगा थेट ‘मातोश्री’वर; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन

भाजपचे ज्येष्ठ नेते धुळ्याचे माजी आमदार तथा धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र ॲड. यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. कदमबांडे यांनी बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ येथे माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.

राजवर्धन कदमबांडे हे कायमच धुळ्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कदमबांडे यांचे जिल्ह्यातील राजकारणात वलय आहे. दोन वेळा धुळे शहराचे आमदार राहिलेल्या राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे चिरंजीव यशवर्धन कदमबांडे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. मात्र काल अचानक यशवर्धन यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून राजवर्धन कदमबांडे यांच्या घराण्याची ओळख आहे, त्यांच्या सुपुत्राच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

धुळे शहराचे माजी आमदार तसेच छत्रपती शाहू महाराज घराण्याचे वंशज म्हणून ओळख असलेल्या राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र असलेले यशवर्धन हे वडिलांबरोबर स्वतःही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असून त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरत भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. ते भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून कार्य करत होते. जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांसोबत त्यांचा चांगला संपर्क आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *