पंढरपूर तालुक्यात MIDC सह विविध उद्योग उभारणीवर महत्वपूर्ण चर्चा

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्यात सत्तांतर होताच आपल्या मतदार संघातील विविध प्रलंबित विकास कामासाठी राज्यशासनाकडे जोरदार पाठपुरावा करीत मंजुरीचा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.मंगळवेढा तालुक्यातील बहुप्रतीक्षित उपसा सिंचन योजनेच्या प्राथमिक स्तरावरील ५८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या योजने बरोबरच पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळवीत आपला करिष्मा दाखविण्यास सुरुवात केली आहे.अशातच पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे या मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि लोकभावनेशी जोडल्या गेलेल्या महत्वपूर्ण प्रश्नास न्याय देण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर जोरदार पाठपुरावा सुरु केल्याचे दिसून आले.राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर तातडीने एमआयडीसी चे पथक १० वर्षानंतर जागा पाहणीसाठी पंढरपूर तालुक्यात आले आणि येथील जनतेच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले.
आता याचेच पुढचे पाऊल म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी दिल्ली दरबारी केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री ना. नारायण राणे यांची भेट घेत पंढरपूर तालुक्यात एआयडीसी उभारणीसह या तालुक्यात कुठलाही मोठा औधोगिक प्रकल्प नसल्याची बाब निदर्शनास आणून देत पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील उद्योग क्षेत्रात केंद्र सरकारच्या सूक्ष्म व लघुउद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून समाविष्ट करण्याच्या बाबीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते.