ताज्याघडामोडी

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.

महिला आयोगानेही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून ताब्यात घेतलं. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे नेलं जाणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *