सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रांगण चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. शासनाच्या निर्णयानुसार १ डिसेंबर पासून शाळा सुरू झाली असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर फॅबटेक पब्लिक स्कूलची शाळा उत्साहात पुन्हा सुरू झालीआहे. विद्यार्थ्यांची काळजी व नियमांचे पालन करून शाळेने पूर्ण तयारी केली होती.शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होते तर विद्यार्थीही शाळेत येण्यासाठी इच्छुक होते. शाळेच्या वर्गखोल्या सॅनिटाइज करून सुशोभित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात आली होती. सर्व मैदान स्वच्छ करण्यात आले होते.
नव्याने शाळेत आलेली मुले सजलेली शाळा पाहून खुश झाली व कुतुहलाने पाहू लागली. पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजू लागली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रतेक विद्यार्थ्यांचे तापमानाची नोंद केली.प्रार्थनेचे स्वर प्रांगणात ऐकू येऊ लागले. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शाळेत मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने हजेरी लावली. पालकांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत मुलांना शाळेत आणून सोडले. कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व शाळेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळा पुन्हा उत्साहात सुरू झाली.
