ताज्याघडामोडी

लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार संवाद

मुंबई, 30 मे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध आणखी शिथील केले जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे.

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल चर्चा झाली आहे. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवार 30 मे 2021 रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील. यावेळी लॉकडाऊनबद्दल काय घोषणा करता, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेलं लॉकडाऊन पूर्णपणे उठवायचा प्रश्नच नसल्याचं सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय असेल याचे संकेत दिले.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये गो स्लो अशा पद्धतीनंच जावं लागणार आहे. त्यामुळं 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये जवळपास पक्का झालेला आहे. पण त्यासाठीचं अंतिम नियोजन होत आहे. ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव अत्यंत कमी झाला आहे, तिथं नेमका कसा निर्णय घ्यायचा. दुकानांच्या उघडण्याच्या वेळा वाढवायच्या का. इथर काही शिथिलता द्यायची का याचा निर्णय होत आहे. पण गर्दी होण्याच्या ठिकाणी कोणतीही शिथिलता मिळणार नाही.

सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, राजकीय, धार्मिक कार्यक्रम याला तर 15 दिवस कुठलीही शिथिलता मिळणार नाही. मात्र ज्या जिल्ह्यांत कोरोनावर चांगलं नियंत्रण आहे, त्याठिकाणी निश्चितच शिथिलता मिळू शकते असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र पूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *