ताज्याघडामोडी

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय;

मुंबई, 12 मे: राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचं ठरवण्यात आलं आहे या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन वाढवण्याचा कल मंत्रिमंडळात दिसून आला. लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री अंतिम निर्णय जाहीर करतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लोकल ट्रेन निर्बंध कायम राहतील. 15 तारखेपर्यंत तसा निर्णय होईल.

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी पुढे म्हटलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील. 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.

राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी सर्वांनीच मागणी केली त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *