गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोनामुळे भाजप नगरसेविकेच्या भावाचे निधन, बहिणीने हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड!

नाशिक, 27 एप्रिल : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका ओळख असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला.

भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर मानवता केअर हॉस्पिटल मुंबई नाका येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री रोशन घाटे यांचं कोरोनामुळे निधन झालं.

भावाच्या निधनामुळे प्रियंका घाटे यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटल प्रशासनावरच आरोप करत जोरदार गोंधळ घातला. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ धक्काबुकी करण्यात आली. एवढंच नाहीतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

हॉस्पिटलमध्ये तोडफोडीनंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. तसंच या प्रकारानंतर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांचा कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, प्रियंका घाटे या नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. वयाच्या अवघ्या 21 वर्षी त्यांनी नगरसेविका होण्याचा बहुमान पटकावला होता. पण, कोरोनाशी लढत असताना आरोग्य यंत्रणेवर आधीच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रियंका घाटे यांच्याकडून हॉस्पिटलवर हल्ला केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *