गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दिवाळीच्या आधीच घरात अंधार, चुलत भावाने भावाला संपवलं, मालेगाव हादरलं; धक्कादायक कारण समोर

सर्वत्र दिवाळीची धामधामू सुरू आहे. पण मालेगावमध्ये ऐन दिवाळीच्या आदल्यादिवशी खळबळजनक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चुलत भावाने चुलत भावाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मालेगावच्या डोंगराळे येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. मालेगावच्या डोंगराळे इथं ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर व्ह्यालिज असं मयत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब व्हयालिज आणि महेश व्ह्यालिज या दोन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी 6 नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर ऊर्फ आबा जनार्दन ह्याळीज (वय 38) जंगलात जखमी अवस्थेत मिळून आला होता. ज्ञानेश्वर अत्यवस्थ स्थितीत मिळून आल्यानंतर त्याला नातेवाईक महादेव ह्याळीज यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले होते. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली.

मात्र त्याच्या मृत्यूबाबत संशय असल्याने तालुका पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून जिल्हा पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र मगर, उपनिरीक्षक सुजित पाटील, हवालदार खांडेकर, पोलीस शिपाई बच्छाव, सचिन दळवी आदींनी कसोशीने तपास केला.

गुप्त बातमीदारांमार्फत या खुनाची चौकशी करीत भाऊसाहेब वसंत ह्याळीज (वय 35) याला अटक केली. भाऊसाहेबची कसून चौकशी केल्यानंत महेश रंगनाथ ह्याळीज (वय 36, दोघे रा. डोंगराळे) याच्या मदतीने आपण ज्ञानेश्वर ऊर्फ आबाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचं सांगितलं. संशयित भाऊसाहेबचा मयत ज्ञानेश्वर हा चुलत भाऊ आहे. ज्ञानेश्वर हा सातत्याने भाऊसाहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दादागिरी करत होता. त्याची नजर संशयास्पद होती. अपमानास्पद वागणूक देणे, जाणूनबुजून त्रास यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरचा काटा काढण्याचं ठरविलं. त्यातूनच हा खूनाचा प्रकार घडला. पोलिसांनी भाऊसाहेब आणि महेश या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *