ताज्याघडामोडी

एकटे अजित पवार नाही, तर राष्ट्रवादीचे तीन बडे नेते दिल्लीत दाखल, मोठ्या हालचाली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली होती.

अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलेली. पण अजित पवार दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे तब्बल तीन नेते दिल्लीत दाखल झाले आहेत, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे तीनही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. तसेच आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरुन पेच निर्माण झालेला आहे. हाच पेच सोडवण्यासाठी अजित पवार आपल्या पक्षाच्या दोन नेत्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *