ताज्याघडामोडी

रंगपंचमीला मनसोक्त खेळली; मग मैत्रिणींसोबत गप्पा मारताना १६ वर्षीय मुलीचा करुण अंत

रंगपंचमी दिवशी रंग खेळून झाल्यानंतर आपल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या एका सोळा वर्षीय मुलीचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे घडली आहे. सृष्टी सुरेश एकाड (वय १६ वर्ष राहणार जाधव वस्ती नजीक, सरडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे) असं मयत मुलीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सृष्टी एकाड ही इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावातील जाधव वस्ती नजीक आपल्या कुटुंबीयांसोबत राहात होती. रविवारी १२ मार्च रोजी रंगपंचमीच्या सणा निमित्त तिने आपल्या मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला होता. मुक्तछंदपणे नैसर्गिक रंगांची उधळण करत ती आपल्या मैत्रिणींबरोबर हसत खेळत बागडत होती.

मात्र, याच वेळी अचानक सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. काही कोणालाच कळालं नाही तिला काय झालंय ते. त्यानंतर चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव यांनी लागलीच तिला उपचारासाठी इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव अभ्यासामध्ये अतिशय हुशार आणि विविध शालेय स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असायचा. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, सोमवारी १३ मार्च रोजी दहावीचा अखेरचा पेपर देण्यापूर्वीच तिचे दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या घरी आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. असा अचानक लेकीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब दु:ख सागरात बुडालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *