ताज्याघडामोडी

गावातल्या तरुणाचा धक्का लागला, डोक्यात तिडीक, कुटुंबाने पोराचा जीवच घेतला

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातल्या विरवाडे गावातील एका तरुणाचा त्याच्याच गावातील तरुणाला धक्का लागला. या वादातून मुलासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी तरुणाच्या घरी जाऊन चाकूने भोसकून तरुणाची हत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भोजू वासुदेव कोळी (वय ३२, रा. विरवाडे ता. चोपडा) असं मयताचं नाव आहे.

भोजू कोळी आणि गावातील दिपक कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरुन वाद झाला होता. या वादातून २ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान भोजू कोळी याच्याकडे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभाबाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) हे गेले. त्यांनी भोजू कोळी आणि त्याचा भाऊ राजेंद्र कोळी यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान भोजू कोळी आणि राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली. यात सागर कोळी याने भोजू कोळी याचा भाऊ राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारून डोके फोडून दुखापत केली.

त्यानंतर सागर कोळी, शोभाबाई आणि वासुदेव कोळी यांनी भोजू यास शिवीगाळ, दमदाटी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सागर कोळी याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने भोजू कोळी याच्या मानेजवळ तसेच पाठीवर आणि इतर ठिकाणी भोसकून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत भोजू कोळी याला चोपडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भोजू कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सागर कोळी, दिपक कोळी, कैलास कोळी, मनोहर कोळी आणि शोभाबाई कोळी या पाच जणांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करत आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *