ताज्याघडामोडी

शरद पवार राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर नाराज, होणार मोठे फेरबदल

महाराष्ट्र आघाडी सरकार राज्यात सर्वच विभागात मोठे फेरबदल करण्याच्या विचारात असून नोकरशाहीपासून मंत्रीमंडळापर्यंत हे बदल होतील असे संकेत मिळाले आहेत.

महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक अटकेपूर्वी सीआरपीएफची मोठी मुव्हमेंट आली पण त्यांची किंचितही माहिती राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कशी लागली नाही असा पवार यांचा सवाल आहे.

त्यांनी या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नोकरशाही मध्ये असे अधिकारी हवेत जे केंद्रीय तपास यंत्रणाच्या बरोबरीने चाली खेळू शकतील असे सांगितल्याचे समजते. गेल्या दोन्ही वेळी मुख्य सचिव पेच अडचणीचा बनला आहे.

सध्याचे मुख्य सचिव देवाशिष चटर्जी २८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या मुदतवाढीसाठी राज्याने केंद्राकडे अर्ज केलेला नाही. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारने दाखल केलेली फाईल केंद्राने दिल्लीतून परत पाठवलीच नव्हती त्यामुळे चटर्जी यांना मुख्य सचिव केले गेले होते. सध्या मनुकुमार श्रीवास्तव, सुजाता सौनिक आणि त्यांचे पती मनोज सौनिक या तिघांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

मलिक यांना राजीनामा द्यावाच लागला तर ही संधी साधून मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदल केले जाणार आहेत असे सूत्रांकडून समजते. शरद पवार यांना जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद द्यायचे आहे पण उपमुख्यमंत्री अजितदादा यासाठी तयार नाहीत असेही समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बीएमसीच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रशासकीय बदल करायचे आहेत अशी अंतर्गत बातमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *