ताज्याघडामोडी

सांगलीत कोरोनाची स्थिती भीषण, रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळेना, रुग्णाला टेम्पोत टाकून वणवण फिरण्याची नामुष्की

सांगली : राज्यात अजून ऑक्सीजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड प्रयत्न करावे लागत आहेत. सांगली जिल्ह्यात अशाच प्रकारची एक घटना आज बघायला मिळाली. एका कोरोनाबाधित महिलेसाठी सांगलीत ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. या महिलेला बेड मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांनी प्रचंड खटाटोप केला. सांगतील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळावा यासाठी त्यांनी महिलेला टेम्पोत बसवलं आणि टेम्पोने अनेक रुग्णालयांच्या चकरा मारल्या. पण तरीही त्यांना बेड मिळत नव्हतारुग्णाला ऑक्सिजन लावून टेम्पोमधून हॉस्पिटल शोधण्याची वेळ

संबंधित कोरोनाबाधित महिलेचं नाव विमल आप्पासाहेब पवार असं आहे. ही महिला सांगली जिल्ह्यातील कर्नाटक बॉर्डर जवळ असलेल्या खटाव गावाची रहिवासी आहे. या महिलेच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी खालवली होती. त्यामुळे महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे. महिलेसाठी तात्पुरती ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी नातेवाईकांना सुदैवाने ऑक्सिजन सिलेंडर मिळाला. त्यानंतर त्यांनी महिलेला टेम्पोत बसवून संपूर्ण सांगली शहर पिंजून काढलं. ते अनेक रुग्णालयात गेले. त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडसाठी चौकशी केली. पण एकाही रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला नाही.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे याचना

अखेत हतबल, हताश झालेल्या नातेवाईकांनी शेवटी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर गाडी आणून लावली. त्यांनी आमदारांकडे बेड उपलब्ध करून देण्याची याचना केली. आमदार गाडगीळ यांनी क्षणाचा विलंब न करता त्या रुग्णास एका रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला.

सांगलीत एका आठवड्यात 278 रुग्णांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांचा वाढतच आहे. कोरोनाबाधितांसह मृत्यूचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. सांगलीत गेल्या आठवड्यात म्हणजेच 25 एप्रिल ते 2 मे या काळात तब्बल 278 रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच आठवड्याभरात 10 हजार 301 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आठवड्याभरात 7 हजार 439 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सांगलीत जनता कर्फ्यू

सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने निर्णय घेतलाय. 5 मे पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागणार आहे. जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्री साठीं होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *