‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ?

‘भीमा’च्या सभासदांना दिलासा देण्यासाठी परिचारक- राजन पाटील पुढाकार घेणार ?

धनंजय महाडिक-डोंगरे यांच्या भाजपा प्रवेशाने परिचारकांसमोर ‘पक्षसंकट’

(पंढरी वार्ता विशेष )

पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असेलला व सर्वात जास्त कार्यक्षेत्र व ऊस उत्पादक सभासद हे पंढरपूर तालुक्यातील असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यास जवळपास तीन दशकानंतर फिरून पूर्वीचेच दिवस पुढे आले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढील वर्षी या कारखान्यास पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. सध्या हा कारखाना बंदावस्थेत असून त्यामुळे परिचारक-पाटील समर्थक सभासदांकडून उघड तर भीमा-लोकशक्ती पॅनलला समर्थन दिलेल्या सभासदांमधून छुपी नाराजी व्यक्त होतो आहे.मोहोळ मतदार संघातील पुढचा आमदार आमचाच असे सांगणाऱ्या धनंजय महाडिक आणि विजयराज डोंगरे यांना मोहोळ मतदार संघातील जनतेने सपशेल नाकारले आता कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक डोंगरे पुन्हा एकत्र येणार कि परिचारक डोंगरे एकत्र येणार याची चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र माजी आमदार राजन पाटील हे पक्षभेद बाजूला ठेवून ऊसउत्पादक सभासदांच्या हितासाठी सुधाकरपंत परिचारक यांना सोबत घेतील अशी श्यकताही वर्तविली जात आहे.  

             भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना स्व.भीमराव महाडिक यांनी सहकारी तत्वावर केली.स्थापनेनंतर काही वर्षे या साखर कारखान्याने काही गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडले पण त्या नंतर हा कारखाना आर्थिक दृष्टया अडचणीत आला.बंद पडला. त्या काळात पंढरपूर तालुक्याचे स्व. औदुंबरअण्णा पाटील गट आणि सुधाकरपंत परिचारक समर्थक गट असे सरळ सरळ दोन राजकीय गट पडले होते आणि या दोन्ही राजकीय गटात प्रचंड कुरघोडीचे,विरोधाचे राजकारण होते.स्व. औदुंबर पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून पंढरपूर तालुक्यात कृषिअर्थक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याकाळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद असणे हे गौरवाचे प्रतिष्ठेचे प्रतीक समजले जाऊ लागले.अण्णा गटाच्या समर्थक उत्पादक शेतकऱ्याना ऊस या नगदी पिकाने मोठा फायदा मिळू लागला आणि परिचारक समर्थक ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मात्र आपला ऊस गाळपासाठी सांगली,सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने शोधावे लागू लागले.यातूनच आपलाही साखर कारखाना असावा अशी भावना परिचारक समर्थकांमध्ये वाढीस लागली.अशातच बंद अवस्थेतील भीमा सहकारी साखर कारखान्यावर १९८७ साली तात्कालीन आमदार सुधाकरपंत परिचारक यांची वसंतदादा पाटील सरकारने नियुक्ती केली आणि परिचारक समर्थक ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला.प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यास सुधाकरपंत परिचारकांनी आपल्या कुशल व्यवस्थापनाचे टॉनिक दिले आणि हा कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत आला.येथूनच सहकारातील डॉक्टर उपाख्याने सुधाकर परिचारक ओळखले जाऊ लागले.  

        जवळपास २५ वर्षांनी २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी पंढरपूरचे आमदार भारत भालके,कल्याण काळे यांना सोबत घेत परिचारक आणि राजन पाटील प्रणित पॅनेलला आव्हान दिले आणि यात ते यशस्वी झाले.या यशात आ. भारत भालके यांचा वाटा मोठा होता हे मान्यच करावे लागेल.भीमा कारखान्याची सूत्रे हाती येताच धनंजय महाडिक यांनी आपल्या समर्थक सभासदांची संख्या वाढविण्याबरोबरच कारख्यावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली.कोल्हापूरचे खासदार आणी भिमा साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून धनंजय महाडिक यांचा राजकीय प्रभाव मोहोळ तालुक्याच्या राजकारणात वाढला अशातच पुढे मनोहर डोंगरे समर्थक गटाने आ. राजन पाटील यांच्याशी फारकत घेत महाडिक गटाशी हातमिळवणी केली आणि महाडिक गटाचा प्रभाव मोहोळ तालुक्याच्या राजकारणात आणखी वाढला.अशातच २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निंवडणुकीत राजन पाटील व महाडिक-डोंगरे गटास समसमान जागा मिळाल्या आणि चिट्ठीची लॉटरी लागत महाडिक -डोगरे गटाचा सभापती झाला.आणि मोहोळ तालुक्यात महाडिक -डोंगरे युतीचा वाढत चाललेला प्रभाव पाहून ‘भीमा’ कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांना मोहोळ तालुक्याचा राष्ट्रवादीचा आमदार आपण ठरवू तोच होईल असे वाटू लागले. पण पक्षीय पातळीवर त्यांना पहिला झटका दिला तो विजराज डोंगरे यांनी. त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेचे ”क्रीम पोस्ट” असलेंले बांधकाम सभापतीपद पटकावले.(अर्थात या फाटाफुटीत धनंजय महाडिक यांनी फुटीर सदस्यांच्या वाहनाचे स्वतः ड्रायव्हिंग करून प्रायोजित कार्यक्रम केला होता हा भाग वेगळा). पण राष्ट्रवादीचा बालेकील्ला समजला जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेवरील वर्चस्व संपुष्ठात आणण्यासाठी याच पक्षाचे ९ वर्ष  जिल्हाध्यक्ष पद भूषविलेल्या मनोहर डोंगरे समर्थकांनी केलेल्या उचापती आणि राष्टवादीचेच तत्कालीन खासदार असेलल्या धनंजय महाडिक यांच्या भूमिकेची चर्चा राज्यभर झाली होती. 

         भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकपदी व पुढे चेअरमनपदी विराजमान होऊन सुधाकर परिचारक यांनी साखर कारखानदारीत प्रवेश केला असला तरी अगदी विठ्ठल कारखान्याच्या उभारणीत त्यांचाही वाटा मोठा होता.पुढे त्यांनी श्रीपूरचा कारखाना सहकारी तत्वावर विकत घेऊन त्याला पुनर्रजीवन दिले.आणि पंढरपूर तालुक्यातिला आपल्या समर्थकांना ऊस गाळपासाठी दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला.जेवढे जास्त गाळप तेवढा जास्त फायदा हे आजचे साखर कारखानदारांचे गणित असले तरी त्याकाळी ऊस गाळपास नेण्यासाठी उसउत्पादकांना चेअरमन अथवा संचालकांचे उंबरे झिजवावे लागत होते हे विसरून चालणार नाही.आज पांडुरंग परिवार म्हणून ओळखला जाणाऱ्या परिचारक समर्थक ऊस उत्पादकांसाठी पांडुरंग सहकारी आणि युटोपियन हे दोन कारखाने उपलब्ध आहेत.दोन्ही कारखाने आर्थिक दृष्टया सक्षम आहेत पण तरीही बंद अवस्थेतील भीमा सहकारी साखर कारखान्यास उर्जीवतावस्था दिलेल्या या कारखान्याचे माजी चेअरमन सुधाकरपंत यांनी या कारखान्यास वाऱ्यावर सोडले नाही आता पुन्हा या कारखान्यास ”बुरे दिन” आलेत.परिचारक,महाडिक,डोंगरे हे तिघेही भाजपात आहेत त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत हे तिन्ही गट एकत्र येणार कि पुन्हा परिचारक आणि राजन पाटील एकत्र येऊन २०१६ च्या पराभवाचा वचपा काढण्याबरोबरच पुन्हा अवसाणयात निघू पाहणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्यास उर्जितावस्था देणार याबाबत राजन पाटील-परिचारक सर्मथक सभासदांसह महाडिक-डोंगरे यांच्यावर नाराज असलेल्या सभासदांचीही उत्सुकता लागून राहिली आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago